अधिकारीच पडले प्रेमात
पुणे ः शहरात अनेक ठिकाणी “आय लव्ह’चे फलक चौकात, पदपथांवर तसेच वाहतूकीस अडथळा होतील, अशा पद्धतीने लावलेले आहेत. त्यातील अनेक फलक नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून लावलेले असून त्याला विद्युत विभाग, पथ विभाग तसेच आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेण्याची तसदीही घेतले गेलेली नाही.
तर, या फलकांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्काळ असे फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आकाशचिन्ह विभागाकडून पाहणी करत 73 फलक अनधिकृत असल्याचे जाहीर केले. आयुक्तांच्या आदेशानुसार गुरूवारी अतिक्रमण विभागाने कारवाईही सुरू केली.
मात्र, तीन ते चार फलक काढताच राजकीय दबावाला सुरूवात झाली. त्यामुळे, अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
शहरात ‘आय लव्ह’ चे 73 अनधिकृत फलक असल्याचे सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाने एका रात्रीत आपली भूमिका बदलत हे फलक अधिकृत आहेत की अनधिकृत हे शोधून नंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका बाजूला पालिका आयुक्तांनीच तीन दिवसांत हे फलक काढण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरू केली. मात्र आता, अचानक या फलकांचा खर्च नागरिकांच्या
पैशातूनच झाला असल्याचा साक्षात्कार झाल्याने आधी अधिकृत फलक शोधण्यात येणार असून नंतर कारवाई करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.
निधीचा अपव्यय होईल…
दरम्यान, आधी 73 फलक अनधिकृत असल्याचे सांगणाऱ्या आकाशचिन्ह विभाग आणि अतिक्रमण विभागाने अचानक आपली भूमिका बदलत शहरातील हे फलक महापालिकेनेच लावल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले,
पालिकेचे फलक आपणच तोडल्यास निधीचा अपव्यय होईल, असे कारण पुढे करत आता नेमके अधिकृत कोणते आणि अनधिकृत कोणते याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती घेतली जाणार
असून जे फलक अधिकृत असतील आणि वाहतूकीस अडथळा ठरत असतील ते इतर ठिकाणी लावले जाणार आहेत. तर जे अनधिकृत असतील ते काढून टाकले जाणार आहेत.