चौकात पैलवानाची गोळ्या घालून खुन ःः घटना सीटीटीव्हीत कैद
पुणे ःः खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून खुन करण्यात आला आहे. खून झालेल्या व्यक्तीचं नाव पैलवान नागेश सुभाष कराळे (वय 38, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे आहे. गाडीत बसल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. काही क्षणांचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
गोळीबारात मृत्यू झालेले नागेश्वर कराळे हे शेलपिंपळगाव येथे कुस्तीची तालीम चालवणारे पैलवान म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या खुनाच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (23 डिसेंबर) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ ही घटना घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात जाऊन बसले होते. त्यानंतर लगेच तिथे एका कारमधून तीन चार जण आले. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश्वर यांना काही कळायच्या आत गोळीबार केला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
या घटनेत नागेश्वर कराळे गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भरती करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली.