ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचे होणार संवर्धन
सासवड ःः सासवड शहरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन होणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाच्या मदतीने इंटेक संस्था पुढाकार घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे होणार असून याबाबत बुधवारी ( दि ११) पाहणी करण्यात आली.

आमदार संजय जगताप, क्षमा पवार, इंटेक संस्थेच्या सुप्रिया महाबळेश्वरे, ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या कल्पना साळुंखे, सोनाली साळुंखे, नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, सासवड न प चे मुख्याधिकारी निखिल मोरे, मोहन चव्हाण, मयूर जगताप, महेश राऊत, राहूल गिरमे आदींनी शहरातील तहसील कार्यालय ( मस्तानी वाडा ) व परीसर, श्री संगमेश्वर मंदिर, श्री चांगावटेश्वर मंदिर, सरदार पुरंदरे वाडा आदी ठिकाणांची पाहणी केली.

काही दिवसांनी तहसील कार्यालयाचे स्थलांतर नवीन शासकीय इमारतीत होणार आहे. सासवड मधील या ऐतिहासिक स्थळांचे जतन, संवर्धन इंटेक संस्थेच्या वतीने पुरातत्व विभागाच्या मदतीने होणार आहे. यामुळे या स्थळांच्या पुनरूज्जीवन होण्यासह पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

पुरंदरला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक मोठा वारसा आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व सवाई माधवराव पेशवे यांचे जन्मस्थळ असलेल्या व आठ शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले पुरंदर आणि परीसरातील इतर ऐतिहासिक, धार्मिक स्थळांच्या विकासार्थ पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी काही महिन्यांपूर्वी पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी समक्ष भेटून चर्चा केली.

विशेष म्हणजे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना ना ठाकरे यांनी कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव लगेच सादर करण्याचे स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात किल्ले व नंतर इतर स्थळांचा विकास यातून होणार आहे. आ संजय जगताप यांच्या मागणीला या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.